Followers

Saturday, October 22, 2016

देवाची दिशा आणि देवाची खोली

देवाची दिशा आणि देवाची खोली

पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. म्हणूनच थोडेसे पूजाघराविषयी..

वास्तुचा ईशान्य कोपरा म्हणजे ईश्वरीस्थान, परमेश्वराचे स्थान असे जरी मानले जात असले तरी ह्या
कोप-याला 'पूजे' पेक्षा प्रथम 'प्रवेश' व मग 'पाणी' या गोष्टींसाठीच प्रथम प्राधान्य देणे वास्तुधारकाच्या दृष्टीने जास्त फायदयाचे ठरते. कारण ईशान्य दिशा ही 'पूजेची' नसून 'पूजनीय' आहे, हे सर्व प्रथम लक्षात घेतले पाहिजे. वास्तुचा ईशान्य कोपरा हा जास्तीत जास्त मोकळा व वजनाने हलका असावा. त्याचबरोबर तो कमी उंचीचा तसेच जास्त उताराचा असावा, रमणीय, मनोहरव प्रसन्न दिसावा, जास्तीत जास्त स्वच्छ, सुंदर व पवित्र ठेवावा असे असेल तरच ईशान्य दिशेचे व त्या कोप-याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात.

एखादया वास्तुला पूर्व ईशान्य किंवा उत्तर ईशान्य यासारख्या 'उच्च स्थानी' मुख्य दरवाजा म्हणजे वास्तुशास्त्राच्या परिभाषेत सिंहद्वार हे शुभलक्षण मानले जाते. त्यामुळे ईशान्येच्या कोप-यात व्हेंटिलेटर, त्याच्या आजूबाजूच्या खिडक्या, त्या ठिकाणचा लो - प्रोफाईल मधला पोर्च, दरवाजासमोरील कमी उंचीचा कट्टा किंवा ओटा, त्याच्या पाय-या इत्यादी गोष्टीं येतात. त्यामुळे हा कोपरा आपोआपच 'हलका', मोकळा, उताराचा, कमी उंचीचा व कमी जडत्वाचा होतो. त्यामुळे सकाळची सूर्यप्रकाशाची सर्व सौम्य व उपयुक्त किरणे आपल्या वास्तुमध्ये थेट प्रवेश करतात. मुख्य दरवाजाला जोडून असलेला हॉल, बैठक खोली, सिटआउट हा भाग वास्तुच्या 'प्रथम दर्शनी' भागात येतो. त्यामुळे साहजिकच दरवाजासमोरील, आतील, बाहेरील आणि आजूबाजूची जागा आपण जास्तीत जास्त स्वच्छ, सुंदर व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या वास्तुधारकाला ईशान्य भागाची सर्व शुभ फळे आपोआपच प्राप्त होतात.

वास्तुच्या या ईशान्य कोप-यामध्ये जर 'ईश्वर स्थान' म्हणून तुम्ही 'पूजाघर' बांधले तर पहिले नुकसान हे होते की पूर्व ईशान्य किंवा उत्तर ईशान्य या दोन्ही पैकी कुठल्याही उच्च स्थानी त्या वास्तुचे सिंहद्वार निर्माण करता येत नाही. त्यामुळे साहजिकच वरील सर्व शुभफलांच्या प्राप्तीपासून वंचित व्हावे लागते. हा झाला एक भाग आणि त्याहुनही महत्वाची बाब म्हणजे वास्तुच्या ईशान्य कोप-यामध्ये जर पूजाघर बांधले तर तो कोपरा 'पॅक होतो व 'जड' होतो. कारण अशाप्रकारे बांधल्या जाणा-या पूजाघराला एवादी दुसरी खिडकी किंवा व्हेंटिलेटर वगळता एकच दरवाजा ठेवला जातो.

वास्तुच्या ईशान्य कोप-यामधे पूजाघराची निर्मिती करण्यापेक्षा पूर्व ईशान्य किंवा उत्तर ईशान्य यासारख्या उच्च स्थानी वास्तुचे मुख्य दार बसवणेचे जास्त फायदेशीर व लाभदायक ठरते. मग आता तुम्ही म्हणाला की वास्तुमध्ये पूजाघर बांधावे तरी कोठे ? ज्यांना पूजेसाठी देवघर, पूजागृह म्हणून 'स्वतंत्र खोली' बांधायची असेल त्यांनी वास्तुच्या पूर्व किंवा उत्तर भागामध्ये पूजाघराची निर्मिती करावी आणि जर का जागे अभावी तुम्हाला स्वतंत्र पूजाघर बांधणे शक्य होत नसेल तर त्यांनी पूजेचे देव, देव्हारा आग्नेयच्या स्वयंपाक गृहातील ईशान्य कोप-यात ठेवावे.

देव्हा-यातील - पूजाघरातील रचना खालील प्रमाणे असावी.

देव्हा-यातील सर्व देव - देवतांच्या मूर्ती तोंडे पश्चिमेस असावी. म्हणजे पूजा करणा-या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पध्दतीने देव - देवतांची मांडणी करावी. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे (शिवलिंगाचे) निमुळते टोक उत्तरेकडे करुन ठेवावे. मारुतीच्या मूर्तीचे किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे ठेवावे.

पूजा घरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोप-यात ठेवावे तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोप-यात ठेवावे. पूजा घरात पांढ-या - पिवळसर रंगाची संमगरवरी फरशी जरुर बसवावी. पूजाघराला तोरण असावे, उंबरठा असावा. पूजाघरातील होमकुंड, अग्निकुंड आग्नेय दिशेस असावे. पूजा, जप, तप, अनुष्ठान, पारायण, सप्ताह वगैरे करताना पूवेर्कडे किंवा उत्तरेकडे तोंड करुन बसावे.

वास्तुमध्ये आग्नेय, दक्षिण, नेऋत्य, पश्चिम, वायव्य या भागात चुकूनही पूजा घर नसावे. देव देव्हारा ठेऊ नये. पूजा करु नये. अशा ठिकाणी केलेली पूजा- जप - तप, आराधना - उपासना, पारायण - सप्ताह इत्यादी गोष्टी निष्फळ ठरतात.

स्तोत्रपठणाचं महत्त्व

स्तोत्रपठणाचं महत्त्व

ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. 

आ पलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला 'गीर्वाणभाषा' म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. 'रामरक्षा स्तोत्र', 'व्यंकटेश स्तोत्र', 'श्री गणपती अथर्वशीर्ष' आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्रं अनेकांच्या पठणत असलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात. 

पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्रपठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्रपठणाचा विशेष काही उपयोग होत नाही, असं म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणताही प्रत्यवाय राहणार नाही. 

कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रूद्राची आर्वतनं करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून 'लघुरूद्र' करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्र पठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार-विचार, व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे, असं ध्यानी येईल. 

डॉ. दोदो आर दो या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्तीमापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला दोन ते चार फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यातून विद्युतलहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्यांचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्रपठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. 

ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युतशक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्दसुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातून आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात हेच स्तोत्रपठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ 'रामरक्षा' स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने 'राम' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. 'र'काराला मंत्रशास्त्रात 'अग्नीबीज' मानतात. 'र' काराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युतशक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युतप्रवाह सुरू होतो. 'र'काराची शक्ती अतिशय वेगवान असते हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे. 

आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की, सकाळी अंथरूणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम्। प्रभाते कर दर्शनम्। हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं तीन वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. 'अॅक्युपंक्चर विदाऊट नीडल्स' या अमेरिकन पुस्तकातल्या 'अॅक्युप्रेशर ब्रेकफास्ट' या प्रकरणात चेहऱ्यावरचे २५ ते ३० पॉइण्टस दिले आहेत. हे पॉइण्टस लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं. 

संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'त म्हटलं आहे की बाराखडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवण
ी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या १० टक्के शक्ती वापरत असतो. ९० टक्के शक्यतो सुप्तावस्थेच असते. ती शक्ती स्तोत्रपठणाने जागृत करता येते. पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केलं पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्यं काटेकोरपणाने पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्रांचं पठण केलं नाही तर मग त्यांची प्रचिती कशी येणार? 

आपल्या तोंडात, टाळूवर ८४ रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्तांच्या बिंदूमधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नादनिर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दांच्या किंवा मंत्राच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातले हायपोथॅलम्स, थॅलम्स अथवा पिच्युटरी ग्रंथीवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनःस्थितीत आपण येतो. 

ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असतं त्या वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे, प्रसन्न वाटेल.

तुम्हाला येणारा अनुभव निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त व उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते. 

आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्यनवीन संकटं त्यात भर घालत आहेत आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही. 

शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते त र ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज १५ ते २० मिनिटं एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चांगले आरोग्यही प्राप्त होईल.

Saturday, October 15, 2016

कोजागरी आश्विन पौर्णिमा

*कोजागरी*
भारतीय सण ऋतुमानात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. पिठुर चांदणं अंगावर घेत रात्र जागवण्याचा उत्सव म्हणजे कोजागरी. प्रसन्न शरद ऋतूच्या आगमनात साजरा होणारा दिवस म्हणून कोजागरीची ओळख आहे. हा दिवस आश्वि्न प्रतिपदेला साजरा केला जातो. म्हणून तिला आश्विनन पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी आकाशात ढगाआड लपलेला चंद्र आपले दर्शन देतो. हवेत हळूहळू गारवा वाढू लागतो आणि चंद्राच्या शीतल, शांत किरणांची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा मसालेदार दुधाचा आस्वाद घेत उत्साहात साजरी केली जाते.  मसालेदार दुधाच्या मेजवानीचा दिवस म्हणून कोजागरी पौर्णिमेची सर्वसामान्यांत ओळख आहे. अलीकडे गरम मसालेदार दुधाचे घुटके घेत काव्य, गायन, वादन, नर्तन, अंताक्षरी, प्रश्नतमंजूषा, नाट्यछटा, गप्पागोष्टी, विनोदी किस्से व चुटके, प्रश्न मंजूषा, जेवण व गप्पागोष्टींच्या मैफलींची साथ देऊन ती अधिक आनंददायी बनवली जाते. या निमित्ताने रात्री एकत्र येऊन चांदण्या रात्रीची मजा अनुभवली जाते. कोजागरी पौर्णिमेशी संबंधित काही दंतकथा आहेत. या संदर्भातील मगध देशातील कहाणी विशेष ऐकण्यास मिळते. कोजागरीच्या दिवशी लक्ष्मीपूजेला खूप महत्त्व आहे. यादिवशी तिची पूजा करतात. तिचे स्वागत करण्यासाठीच मध्यरात्री बारापर्यंत सर्वजण जागे राहतात. या दिवशी मंदिरे, उद्याने,या ठिकाणी आपल्याला गर्दी पहायला मिळते,काही शहरात उद्याने बारा वाजे पर्यंत उघडी ठेवली जातात. दिव्यांचा लखलखाट केला जातो. काही जण दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी देवीची पूजा करतात. नंतर तिला पोहे आणि शहाळ्याचा नैवेद्य दाखवतात. इतरांना देऊन मग तो प्रसाद म्हणून ग्रहण करतात. या दिवशी लक्ष्मीप्रमाणे चंद्राचीही पूजा केली जाते. या दिवशी महिला चंद्राला ओवाळतात. त्याची मनोभावे पूजा करतात. केशर, सुकामेवा, दुधाचा मसाला घालून घरोघरी दूध आटवले जाते. रात्री बाराला चांदण्या रात्री त्या दुधाचे घुटके घेतले जातात. यामागे शास्त्रीय कारण सांगितले जाते. आश्वि न पौर्णिमेला चंद्राची किरणे अतिशय शांत असतात. ती अंगावर पडणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. आयुर्वेदातही त्याचे महत्त्व सांगितले आहे म्हणूनच या दिवशी चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गायीची पूजा केली जाते. या दिवशी महिला शुभ्र वस्त्रे परिधान करून चांदीचे दागिने घालतात.
कोजागरीनिमित्त नातेवाईक, मित्र एकमेकांना भेटतात. एकत्रित जेवणाचा बेत आखून सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतात. लहान मुलांसाठी तर ही एक पर्वणीच आहे. मुलांसाठी काही जण बाहेर जाण्याची योजना आखतात. त्यांच्यासाठी बागेत जाऊन भोजनाची मजा लुटतात. अलीकडे मोठमोठ्या इमारतींमधील लोक कोजागरी पौर्णिमा उत्साहाने साजरी करतात. चटपटीत पदार्थ, जागरण, संगीत रजनी, मैफली रंगवतात. काही जण सहकुटुंब चित्रपट, नाटकांचा बेत आखतात. कोजागरीच्या चांदण्या रात्री विविध कार्यक्रमांच्या आखणीतून ती अधिक आनंददायी व उत्साही बनवतात.

*दुधाचा मसाला*
साहित्य  :- ५० ग्रॅम काजू,२५ ग्रॅम पिस्ते, २५ ग्रॅम बदाम, १० ग्रॅम वेलची, २० ग्रॅम केशर, १ जायफळ
कृती : सर्व साहित्य एकत्र करून  मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. आणि बाटलीत भरून ठेवावे.

*मसाला दुध*
साहीत्य:- दूध एक लिटर (म्हशीचे),  साखर अर्धी वाटी (आवडीनुसार कमी-जास्त करावी),
दुधाचा मसाला*
साहित्य  :- ५० ग्रॅम काजू,२५ ग्रॅम पिस्ते, २५ ग्रॅम बदाम, १० ग्रॅम वेलची, २० ग्रॅम केशर, १ जायफळ
वेलचीपूड १ टीस्पून, जायफळ १/२ टीस्पून, बदाम, काजू, पिस्ताची पावडर दोन टेस्पून (सजावटीसाठी थोडे पातळ काप ठेवावेत), चारोळी १ टीस्पून, केशर
कृती:- प्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यामधे दुध तापण्यासाठी गॅसवर ठेवावे. तापून फुगा आला की,गॅस बारीक करावा व त्याच्यामधे डाव टाकावा अथवा एक काचेची चहाची बशी पालथी टाकावी म्हणजे दुध तळाला लागत नाही.आणि पाच मिनीटे उकळू द्यावे. उकळून थोडे आटले की त्यामधे दुधाचा मसाला (वेलची,जायफळाची पूड,सुक्या मेव्याचे कुट व आणि केशर) साखर घालावी. एक उकळी आणावी व गॅस बंद करावा. सजावटीसाठी शिल्लक ठेवलेले सुकामेव्याचे काप व चारोळ्या वरून घालावेत व आवडीप्रमाणे, फ्रिजमधे थंड करून किंवा गरम पिण्यास द्यावे.शक्यतो कोमटसर दुधच प्यावे.चवीला छान पण लागते व थंड दुधाने पोटात गॅस होतात,ते होण्याची भिती पण रहात नाही.
टीप :- सुक्यामेव्याची  बारीक पावडर न करता थोडे भरड कूटच ठेवावे दुध पिताना मधे-मधे दाताखाली आलेले छान लागतात.

Tuesday, October 11, 2016

जमिनीवर बसून जेवायचे फायदे

*🔺जमिनीवर बसून जेवायचे फायदे🔺*

*1 :-  पचन सुधारते* 

जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते  या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.

*2 :- वजन घटवण्यास मदत होते*

जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. जमिनीवर बसून जेवताना, मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते.  वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे.  जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते.  टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.{1}

*3 :- लवचिकता वाढवत*े 

पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.

*4:-  मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते*

जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. प्रख्यात आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यामते, जेवताना त्याचा स्वाद, चव, स्वरूप यावर लक्ष दिल्याने तसेच तुम्ही किती प्रमाणात त्याचे सेवन करत आहात याबाबत सजग राहिल्यास तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.

*5 :- कुटुंबातील सदस्यांशी जवळीक  वाढते*

दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा. कारण जमिनीवर बसून जेवल्याने मन शांत व प्रसन्न होते. दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास  मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी  जवळीक वाढते.

*6 :- शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते*

शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व  सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.

*7 :- दीर्घायुषी बनवते* 

ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या{2} अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे.  कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.

*8 :- गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात*

Yoga for Healing या  पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.  पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व  कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.

*9:-  चंचलता कमी होते *

मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील  त्रास कमी होतात.

*10:- हृदयाला होणारा रक्तपुरवठा  सुधारतो*

काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ?  हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला  उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.

*📝 ज्ञानामृत मंच*